As
Hemant Nerurkar gets appointed as the Managing Director of
Tata Steel, Suhas Phadke writes an
amazing article in Maharashtra Times!
मराठी तरुणांनी धडा घ्यावा सुहास फडके
टाटा स्टील या जगातील प्रमुख कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या सर्वोच्चपदी हेमंत नेरूरकर यांची नियुक्ती होण्याने मराठी युवकांना आणि समाजाला , गुणांची कदर होते हे पुन्हा एकदा लक्षात येईल .
महाराष्ट्र आणखी सहा महिन्यांनी , पन्नाशी पूर्ण करेल . पण गेल्या काही दशकांत , मराठी तरुणांमध्ये सतत तुमच्यावर अन्याय होतो असे बिंबवले जाते आहे . याला उत्तर म्हणून त्यांनी दगड हाती घ्यावेत , हिंसाचार करावा तरच त्यांच्याकडे इतरांचे लक्ष जाईल असे सतत सांगितले जाते . मराठी जनरेशन नेक्स्टला काही वेळा असमान स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे हे खरे आहे . रेल्वेतील भरती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे .
पण मराठी माणसाला नोकरीत सतत दुय्यम वागणून मिळते हा मात्र निव्वळ अपप्रचार आहे . खाजगी क्षेत्रात भरती करताना , उपयुक्तता हा एकमेव निकष असतो . संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कंपनीच्या योजनेत बसतो की नाही हे बघितले जाते . कंपनीचा फायदा करून देणे हे त्याचे कर्तव्य असते . सरकारी नोकरीत , फायद्यातोट्याचे गणित निव्वळ रुपयांत मांडले जात नाही . तेथे सरकारचे , पर्यायाने लोकांचे काम किती वेगाने तडीस जाते याला महत्त्व असते . पण दोन्ही क्षेत्रांत , सचोटी आणि कर्तृत्व यांनाच अग्रक्रम दिला जातो . अर्थात सध्या महाराष्ट्राच्या सरकारी कारभारात हे दोन्ही गुण अवगुण ठरत असल्याचे चित्र आहे .
टाटा उद्योग समुहात मराठी अधिकाऱ्यांनी सवोर्च्च पद भूषवल्याचे नेरुरकर हे पहिले उदाहरण नाही . अजित केरकर, सुमंत मुळगावकर, द . रा . पेंडसे, किशोर चौकर अशी भलीमोठ्ठी यादी देता येईल . पण ज्या टाटांनी भारतात उद्योगाची मुहुर्तमेढ रोवताना पोलाद निमिर्तीपासून प्रारंभ केला त्या कंपनीच्या १०२ वर्षाच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे नेरुरकर पहिले आहेत . टाटा समुहाचे वैशिष्टय हेच की , देशाला विकासात आवश्यक ठरणाऱ्या पोलाद उद्योगात त्यांनी पाय रोवले . विमान सेवा . रसायने , वाहननिमिर्ती ते आताच्या आयटी उद्योगापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी देशाचा विचार केला . अशा समुहाच्या विकासात मराठी अधिकाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली याचा अभिमान खचितच आपणास वाटायला हवा .
मराठी माणसाचा पिंड हा नोकरीचा . पण नोकरीतही अगदी वरच्या स्थानावर जाता येते , याची अनेक उदाहरणे आहेत . सिटी बँकेचे प्रमुख विक्रम पंडित , बोइंगचे दिनेश केसकर अशांनी हे दाखवून दिले आहे . व्यवसायात किर्लोस्कर , डहाणुकर , वालचंद , केळकर , चितळे बंधू , समर्थ उद्योग समुहाचे गावकर , दिपक घैसास अशी अनेक नावे घेता येतील . त्यांनीही चोख व्यावसायिक असा नावलौकिक मिळवला . पण खेदाची बाब अशी की महाराष्ट्राचे धोरण हे अशा व्यावसायिकांना उत्तेजन देण्यात कमी पडले . सतत कोणत्या ना कोणत्या सरकारी यंत्रणेची चौकशी , लाल फित सोडवायची असेल तर वजन ठेण्याची मागणी अशा बाबींनी बेजार झालेल्यांच्या कैफियत ऐकायलाही कोणाला वेळ नाही अशी स्थिती आहे .
या सगळ्यामुळेच की काय, मराठी युवक जातीचे राजकारण करत आपला फायदा साधणा-या नेत्यांच्या मागे मेंढरासारखे जातोय , त्यांच्या इशा-यावर हाणामारी , दगडफेक करत स्वत : च्या पायावर धोंडा मारून घेत आहे . दुर्दैवाने , आज असेच नेते गल्लीबोळात निर्माण होत आहेत . तरुणांची फौज पोसून नेते कोट्यधीश बनत आहेत . पैशांच्या राशीत लोळायचे असेल तर राजकारण हा एकमेव मार्ग आहे अशी गैरसमजून तरुण घेत आहेत .
आपल्याकडे पदवी आहे तरीही आपल्याला नोकरी मिळत नाही हा आपल्यावर अन्याय आहे अशा त्यांच्या समजूतीला खतपाणी घातले जाते आहे . पण सध्याच्या युगात केवळ पदवीला महत्त्व नाही तर , आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि इंग्लीश भाषेवर प्रभुत्व या बाबी निर्णायक ठरतात हे त्यांना कोणी समजावून सांगत नाही . आता कंम्प्युटरची माहिती नसेल तर जॉब माकेर्टमध्ये किंमत कमी होते हे त्यांनी समजून घ्यायला हवे . बँकेतील क्लार्कच्या पदासाठीही कम्प्युटरवर काम कसे करायचे हे माहीत असायला हवे अशी स्थिती आहे . कॉल सेंटरसाख्या ठिकाणी काम करायचे असेल तर इंग्लीश भाषा यायलाच हवी . पण कोणताही राजकीय नेता आणि पक्ष आपल्या अनुयायांना हे सांगत नाही , त्या दृष्टिने त्यांची तयारी करून घेत नाही . त्यामुळे मराठी युवकांवर हलकी कामे करण्याची पाळी येते . अर्थात अशी कामे करण्यात कोणताही कमीपणा नाही , पण हेही त्यांना कोणी सांगत नाही . अशी कामे करता करता अनेकांनी शिक्षण घेऊन आयुष्यात मोठी भरारी मारली आहे . धीरूभाई अंंबानी हे सुरूवातीच्या काळात , पेट्रोल पंपावर काम करत होत , डोक्यावर कापडाचे गठ्ठे घेऊन दारोदारी फिरत होते .
नोकरीचाच ध्यास घेणारे मराठी तरुण सरकारी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न करतात . पण तेथेही फार थोडे , आयएएस , आयपीएस अशा अधिकारपदांच्या नोकऱ्यांचा विचार करतात . लष्करात थेट अधिकारी होण्याचे स्वप्न तर फारच थोडे मराठी युवक बघतात . सरकारी नोकरीत जायचे तेही पैसे मिळवायला . अर्थात ते अयोग्य मार्गाने असे त्यांना वाटते . लोकांचे हित येथेही दुय्यम ठरते . मंत्री आणि राजकारणी यांच्या मागे मागे फिरून नोकरीत लाभाची खुर्ची कशी मिळेल आणि ती कशी टिकेल याकडे लक्ष .
असे चित्र असताना , नेरूरकर यांनी , चिकाटी , कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मिळवलेले यश मराठी तरुणांना प्रगतीची दारे खुली करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही .
.