Sunday, December 20, 2015

You can read my original article on Digital Katta (Online Diwali Ank)
--------------------------------------------------------------------------------------------


ह्या बालगीतानं नर्सरीमध्ये असतानाच माझ्या मनाचा वेध घेतला आणि लंडन शहर हे माझ्यासाठी परीकथेतील स्वप्ननगरी झाली! नंतर एनिड ब्लायटन आणि चार्ल्स डिकन्सची पुस्तकं वाचून लंडन बघण्याची इच्छा वाढली. शेवटी २००६ मध्ये ऑफिसच्या कामानिमित्त लंडननगरी बघायचा योग आला. मग सगळे भारतीय बघतात ती स्टँडर्ड आकर्षणं पार पाडली… ज्यांना माझ्या एक मित्रानं ‘पटेल पॅाईंट्स’ अशी उपाधी दिली होती! पुढे २०१० च्या दौऱ्या आधी मी पुलंचं ‘अपूर्वाई’ वाचलं कारण मला बघायचं होतं की ५० वर्षात लंडन किती बदललं आहे. मजा म्हणजे पुलंचं लंडन आणि आताचं लंडनमध्ये ‘टेक्नॉलॉजी’ सोडली तर फार फरक नव्हता… पण मराठी माणसामध्ये नक्कीच खूप फरक पडला आहे.  त्या भेटीनंतर २-३ वर्षं मी लंडन आणि मराठी माणसाच्या मधला दुवा शोधू लागलो. २०१५च्या भेटीत मी  ‘लंडनचा मराठी नकाशा’ बनवायचं ठरवलं आणि मराठी संस्कृती व इतिहासाशी निगडीत अशा ६०हून अधिक वास्तू मी शोधून काढल्या. बा.सी.मर्ढेकरांपासून आचार्य अत्रे आणि नामदार गोखलेंपासून पंडिता रमाबाईंपर्यंत कित्येक नामवंत मराठी माणसांचं या महानगरात वास्तव्य होतं.

भविष्यात तर युरोप मधील मराठी पाऊलखुणा असं एक पुस्तक लिहिण्याची माझी इच्छा आहे. पण त्याकरिता अजून वेळ असल्यामुळे, या लांबलचक यादीत हाडाच्या मराठी माणसांनी आवर्जून बघितल्या पाहिजे अशा लंडनमधल्या ‘टॉप टेन’ जागा मी या लेखात शेअर करतो आहे.


--------------------------------------------------------------------------------------------



#  लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
पत्ता: सेंट जॉन्स वूड रोड, लंडन, NW8 8QN
महत्व: लॉर्ड्सचे मैदान मराठीच नव्हे तर समस्त जगातील क्रिकेट प्रेमींचं श्रद्धास्थान आहे. लॉर्ड्सच्या म्युझियममधल्या ऑनरबोर्डवर आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावं आहेत… आणि त्या मानाच्या यादीत ४ मराठी माणसांची नावं झळकतात!
खूपशा क्रिकेट प्रेमींना ही खंत आहे की या यादीत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरांचं नाव नाही
२०१४ साली लॉर्ड्सला २०० वर्षं पूर्ण झाली तेव्हा मार्लीबन क्रिकेट क्लब विरुद्ध रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI असा सामना रंगला. या दोन संघांचे कर्णधार होते सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा. त्यावेळी सचिनच्या खूप गाजलेल्या एन्ट्रीचा हा व्हिडिओ पहा. टाळ्या वाजवणाऱ्या गोऱ्यांच्या डोळ्यात आदर आणि प्रेम किती ओसंडून वाहतंय हे लक्षात येईल

खास बात: – लतादीदींचं क्रिकेटवरचं प्रेम जगजाहीर आहे. पण अगदी कमी लोकांना माहीत आहे की त्यांचं लॉर्ड्सला लागून एक घर तर आहेच पण खुद्द स्टेडियममध्ये त्यांची एक कायमस्वरूपी राखीव गॅलरी आहे.
 जवळचे ट्यूब स्टेशन: सेंट जॉन्स वूड
संकेतस्थळ: www.lords.org
--------------------------------------------------------------------------------------------
# सेवर्नड्रुग कॅसल
पत्ता: कॅसल वूड, शुटरज हिल, लंडन SE18 3RT




सुवर्णदुर्ग
सुवर्णदुर्ग

महत्व: १८व्या शतकात, भारतात स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या ब्रिटिशांचं जे स्वप्न होतं त्यात  मराठा साम्राज्य हा सर्वात मोठा अडथळा होता… आणि मराठ्यांचं कवचकुंडल होतं त्यांचं नौदल म्हणजे मराठा आरमार. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अभेद्य जलदुर्गांची माळच विणली होती जी पुढे जाऊन आरमाराचा कणा बनली. सिंधुदुर्ग… पद्मदुर्ग… कुलाबा… विजयदुर्ग… पण माझा सर्वात आवडता जलदुर्ग म्हणजे दापोली तालुक्यातला सुवर्णदुर्ग! मुंबईस्थित इंग्रजांना कळून चुकलं होतं की आंग्रेंचं आरमार नेस्तनाबूत केल्याशिवाय त्यांचं समुद्रावरचं प्रभुत्व टिकून राहणार नाही. म्हणून १७५५ साली, सर विल्यम जेम्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी सुवर्णदुर्गावर चढाई केली आणि यशस्वी झाले.




1 Author @ Severndroog Castle
लेखक सेवर्नड्रुग कॅसलच्या परिसरात

सर जेम्सच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या या विजयाच्या स्मरणार्थ लंडनच्या एका टेकडीवर ‘सेवर्नड्रुग कॅसल’ नावाचं एक स्मारक उभारलं. २०१३-१४ मध्ये या तीन मजली मनोऱ्याचा जीर्णोद्धार झाला. आता इथे एक टी रूम आणि वस्तुसंग्रहालय आहे. २०१० साली जेव्हा मला या स्मारकाचा शोध लागला तेव्हा त्यांच्या संकेतस्थळावर आंग्रे घराण्याचा उल्लेख ‘चाचे’ असा केला होत. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या माहितीची दुरुस्ती करून घेतली. आता त्यांच्या वस्तुसंग्रहालयात कान्होजी आंग्रेंचे चित्रही लावले आहे. २०१५ च्या भेटीत मी त्यांना मराठा आरमारबद्दलची पुस्तकं भेट दिली. भविष्यात या वास्तूमध्ये मराठा आरमारावर एक प्रदर्शन भरवण्याच्या माझ्या इच्छेबद्दल तिथल्या पदाधिकाऱ्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

खास बातजवळच्या ग्रीनिचमधल्या नॅशनल मेरीटाइम म्युजियममध्ये १७५६च्या विजयदुर्गच्या लढाईवर आधारित 'कॅपचर ऑफ घेरिया' नावाचं तैलचित्र बघण्यासारखे आहे!
जवळचे ट्यूबट्रेन स्टेशन: नॉर्थ ग्रीनीचवुलीच
संकेतस्थळ: www.severndroogcastle.org.uk
--------------------------------------------------------------------------------------------

# लंडन ब्ल्यू प्लाक
लंडनच्या ज्या वास्तूंमध्ये सुप्रसिद्ध व्यक्ती राहून गेल्यात तिथे ब्ल्यू प्लाक म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ निळ्या रंगाच्या पाट्या बसवण्याची प्रथा आहे. गांधीनेहरूपटेलआणि टागोरांसहित ३ मराठी महामानवांच्या ब्ल्यू प्लाक या शहरात आहेत.
पत्ता: १०, हावली प्लेस, लंडन, W2 1XA
महत्व: 1 10 Howley Place१९१८ साली लोकमान्य टिळकांनी इंग्लंडला भेट दिली. तेव्हा त्यांचं वास्तव्य मेडा वेल नावाच्या जागी होतं या जागेला लंडनचं ‘छोटं वेनिस’ म्हणून ओळखलं जातं. ते ज्या घरात राहिले त्याच्या दर्शनी भागावर कॅनलेटो नावाच्या इटालियन चित्रकाराची प्लाक आहे. टिळकांची प्लाक सहजपणे दिसत नाही कारण ती मुख्य दाराच्या बाजूला पहिल्या माळ्यावर आहे. ती बघण्याकरिता रस्ता ओलांडून समोरच्या फूटपाथवर जावं लागतं कारण ती एका झाडाच्या पानांमध्ये दडली आहे.
जवळचे ट्यूब स्टेशन: वॉरिक अॅवेन्यू
पत्ता: ६५, क्रॉमवेल अॅवेन्यू, लंडन, N6 5HS
महत्व: 2 65 Cromwell Avenue१९०६ साली ‘शिवाजी महाराज स्कॉलरशिप’ अंतर्गत विनायक दामोदर सावरकर उच्च शिक्षणाकरिता लंडनला आले. त्यांच्या राहण्याची सोय श्यामजी कृष्ण वर्मांनी त्यांच्या हायगेटवरच्या घरात केली होती. ते घर भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांचं माहेरघरच होतं आणि म्हणून त्याला ‘इंडिया हाऊस’ असे संबोधले जायचे. खरंतर हे ‘ होस्टेल’ स्वातंत्र्य चळवळीचा भारताबाहेरचा सर्वात मोठा ‘अड्डा’ होता. लाल हर दयाल, भिकाजी कामा आणि मदनलाल धिंग्रासारखे क्रांतिकारी हे इंडिया हाऊसशी संबंधित होते. या वास्तूच्या दर्शनी भागावर सावरकरांची ब्ल्यू प्लाक आहे. जरी लंडननगरी सावरकरांचे तिथले घर जतन करीत आहे तरी त्यांची मुंबई आणि भगुरची घरं अजूनही उपेक्षितच आहेत.
जवळचे ट्यूब स्टेशन: आर्चवे
पत्ता: १०, किंग हेन्री रोड, लंडन, NW3 3RP
महत्व: 3 10 King Henry Rd for saleलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इनमध्ये शिकत असताना बाबासाहेब या वास्तूमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. याच वर्षी महाराष्ट्र शासनांनी हे घर ₹४० कोटीला विकत घेऊन तिथं बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं ठरवलं आहे. ही मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे पण मुंबईमधलं आंबेडकरांचं निवासस्थान ‘राजगृह’ही जतन करण्याची गरज आहे हे आपण विसरता कामा नये.
जवळचे ट्यूब स्टेशन: चॉक फार्म
संकेतस्थळ: www.english-heritage.org.uk/visit/blue-plaques
--------------------------------------------------------------------------------------------
# आजीबाई बनारसेंचे घर


आजीबाई बनारसेंची खानावळ
आजीबाई बनारसेंची खानावळ

पत्ता: २५, हूप लेन, गोल्डर्स ग्रीन, लंडन, NW11 8JN
महत्व: Kahanee-Londanchya-Aajibaic५० ते ७०च्या दशकात लंडनला कामाकरिता गेलेल्या मराठी माणसाचं हक्काचं घर म्हणजे २५, हूप लेन. या घरात राहायच्या आजीबाई बनारसे – एक असाधारण व्यक्तिमत्व! विश्वास बसणार नाही अशी त्यांची गोष्ट आहे… यवतमाळ जवळच्या एका खेड्यातली अशिक्षित विधवा बाई पुढे जाऊन लंडनमधली मल्टीमिलियनर बनली. वयाचा ३३व्या वर्षी राधाबाई विधवा झाल्या तेव्हा त्यांच्या पदराला ५ मुली होत्या. नातेवाईकांच्या हट्टामुळे त्या सीतारामपंत बनारसे नावाच्या वृद्ध माणसाशी लग्न करायला तयार झाल्या. बनारसेंच्या २ मुलांची लंडनमध्ये एक खानावळ होती आणि त्यांना मदत करण्याकरिता हे जोडपं इंग्लंडला पोहोचलं. इथे खानावळीमध्ये येणाऱ्या मराठी मंडळींनी त्यांना ‘आजीबाई’ म्हणायला सुरुवात केली. १९५३ साली सीतारामपंतांच्या मृत्यूनंतर आजीबाईंनी लंडन सोडण्याऐवजी स्वतःची खानावळ चालू केली. सकाळी ६ ते रात्री १० चालणारी ही खानावळ एवढी प्रसिद्ध झाली की काही वर्षात आजीबाई कित्येक इमारती व गाड्यांच्या मालकीणबाई झाल्या. भारतातून गेलेला क्रिकेट संघ असो किवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री… पाश्चिमात्य जेवणाला वैतागलेले सर्वजण आजीबाईंच्या घरी येउन मराठमोळ्या भोजनावर ताव मारायचे. आजीबाईंची साईबाबांवर खूप श्रद्धा होती आणि १९६५ मध्ये त्यांनी आपल्याच घरात साईबाबांचं मंदिर बांधलं जे युरोपमधलं पहिलं हिंदू मंदिर आहे. १९८३ मध्ये त्यांच्या निधनानंतर, ब्रिटनच्या सगळ्या मोठ्या वृत्तपत्रांनी त्यांचा ‘Prominent Hindu’ म्हणून गौरव केला. २०१० मध्ये जेव्हा मी त्यांचं घर बघायला गेलो तेव्हा त्यांच्या जावईबुवांनी म्हणजे श्री. जीरापुरेंनी माझं प्रेमानं आदरातिथ्य केलं.
खास बात: आजीबाईंच्या जीवनाबद्दल अधिक माहितीकरिता सौ. सरोजिनी वैद्यंनी लिहिलेलं कहाणी लंडनच्या आजीबाईंची हे पुस्तक नक्की वाचा!
 जवळचे ट्यूब स्टेशन: गोल्डर्स ग्रीन
--------------------------------------------------------------------------------------------
# लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
पत्ता: ९९ ऑल्डविच, लंडन, WC2B 4JF
महत्व: 
LSE Clement Houseएल.एस.ई. म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे जगातल्या अग्रगण्य अर्थशास्त्र महाविद्यालयांपैकी एक आहे. इथं आंबेडकरांनी १९१६ ते १९१७ साली शिक्षण घेतलं. पैशाच्या अभावामुळे बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडला. पुढे १९२१ मध्ये त्यांनी भारतीय रुपयावरचा प्रबंध सादर करून पदव्युत्तर पदवी मिळवली. या संस्थेच्या परीक्षा भवनाचं नाव ‘क्लेमंट हाउस’ असं आहे आणि त्याच्या तळमजल्यावर आंबेडकरांचा पुतळा आणि माहिती देणारा फलक आहे. ही इमारत फक्त परीक्षांच्या वेळीच उघडी असल्यामुळे हा पुतळा बघण्यासाठी आधी फोनवर परवानगी घ्यावी लागते.

 जवळचे ट्यूब स्टेशन: टेंपल
संकेतस्थळ: www.lse.ac.uk


लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

--------------------------------------------------------------------------------------------
 मादाम ट्युसोड्स वॅक्स म्यूजियम
पत्ता: मार्लीबन रोड, लंडन, NW1 5LR
महत्व: images (1)गेली २ शतके मादाम ट्युसोड्स वॅक्स म्यूजियममध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेल्या व्यक्तींचे मेणाचे पुतळे प्रदर्शित केले जातात. भारतीयांपैकी महात्मा गांधीइंदिरा गांधी,अमिताभ बच्चनऐश्वर्या राय आणि शाहरुख खानयांचे पुतळे इकडे बघायला मिळतात. या पाच भारतीयांव्यतिरिक्त दीड मराठी माणसांच्या प्रतिकृती इथे आहेत. तुम्ही म्हणाल ‘दीड’? अहो… सचिन तेंडुलकर अख्खा आणि सलमान खान अर्धा! ;-)
https://www.youtube.com/watch?v=jtuoCniokm4 (Video showing unveiling of Sachin’s statue)
स्टॉप प्रेस: हल्लीच काही काळाकरिता सचिनचा पुतळा सिडनीच्या मादाम ट्युसोड्सला हलवण्यात आला आहे.
जवळचे ट्यूब स्टेशन: बॉन्ड स्ट्रीट
संकेतस्थळ: www.madametussauds.com
--------------------------------------------------------------------------------------------
# सेसिल हेपवर्थ प्लेहाऊस
CH Playhouse
पत्ता: ब्रिज स्ट्रीट, हर्स्ट ग्रोव, वॅालटन ऑन टेम्स, सरी, KT12 1AU


Cecil_M._Hepworth_1915
सेसिल हेपवर्थ

महत्वभारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंनी, ‘द लाईफ ऑफ क्राइस्ट’ हा चित्रपट पाहिल्यावर हिंदू पौराणिक कथांवर चित्रपट बनवायचं ठरवलं. त्याकरिता त्यांना चित्रपट बनवण्याचं तांत्रिक शिक्षण घेणं जरुरीचं होतं. आपली सगळी संपत्ती एकत्र करून ते ख्यातनाम चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्या लंडन जवळच्या वॅालटन ऑन टेम्सस्थित स्टुडिओमध्ये पोहोचले. इथलं शिक्षण घेऊन त्यांनी १९१२ साली भारतातला पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. वॅालटन ऑन टेम्सस्थित हा स्टुडिओ ६०च्या दशकात पाडण्यात आला पण त्यातला रंगमंच (प्लेहाऊस) अजूनही शाबूत आहे.
https://www.youtube.com/watch?v=mGUhwjCPYpY (Video of the film ‘Raja Harishchandra’)
 जवळचे ट्रेन स्टेशन: वॅालटन ऑन टेम्स
--------------------------------------------------------------------------------------------
# महाराष्ट्र मंडळ लंडन


महाराष्ट्र मंडळ लंडन
महाराष्ट्र मंडळ लंडन

पत्ता: ३०६ डॉलीस हिल लेन, लंडन NW2 6HH
महत्व: १९३२ मध्ये लंडनमधल्या मराठी माणसांने न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली एक सांस्कृतिक संस्था काढायची ठरवली आणि ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’चा जन्म झाला. मंडळाच्या स्थापनेच्या वेळी राउंड टेबल कॉन्फरन्सकरिता आलेली नामवंत मराठी मंडळी हजर होती. त्यात बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर आणि कोल्हापूर संस्थानाचे दिवाण सुर्वे यांचा समावेश होता. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मंडळाच्या कामात खंड पडला. १९५२ साली बाळासाहेब खेरांची नियुक्ती भारताचे उच्च सचिव म्हणून लंडनमध्ये झाली. त्यांच्या प्रयत्नानं मंडळाला पुन्हा संजीवनी मिळाली. १९८९ मध्ये मंडळानं एक बंद पडलेली चर्चची इमारत विकत घेतली आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता एक स्थायी वास्तू मिळाली.
https://www.youtube.com/watch?v=rSHR_2r4s-s (Video of Ganesh Visarjan Procession at MML)
 जवळचे ट्यूब स्टेशन: डॉलीस हिल
संकेतस्थळ: www.mmlondon.co.uk
--------------------------------------------------------------------------------------------
# ब्रिटिश म्युझियम


British_Museum_Dome
ब्रिटिश म्युझियम डोम

पत्ता: ग्रेट रसल स्ट्रीट, लंडन WC1B 3DG
महत्व: Shivaji_British_Museumलहान असताना मला एक प्रश्न पडायचा “शिवाजी महाराज नक्की कसे दिसत असतील? सूर्यकांत मांढरेंसारखे?” महाराजांच्या काळात तर छायाचित्रांचा शोध लागला नव्हता. मग इंटरनेटवर कळलं की महाराजांचे दोन ट्रु पोर्ट्रेटस आहेत… एक अॅमस्टरडॅमच्या‘राइक्सम्यूसीयुम’मध्ये आणि दुसरं लंडनमधल्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. महाराष्ट्र आणि भारतासहित जगातल्या अनेक दुर्मिळ वस्तू ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शित केल्या आहेत. महाराजांचे हे चित्र रोज प्रदर्शित होत नाही पण काही महिने आधी विनंती केल्यास ते बघण्याची परवानगी मिळू शकते.
 जवळचे ट्यूब स्टेशन: रसेल स्क्वेअर
संकेतस्थळ: http://www.britishmuseum.org
--------------------------------------------------------------------------------------------
#१० ग्रेज इन
पत्ता: ग्रेज इन, लंडन WC1R 5JA
महत्व:


ग्रेज इन
ग्रेज इन

ग्रेज इन हे लंडन मधले सर्वात नावाजलेले विधी महाविद्यालय आहे. या संस्थेमध्ये २ स्वातंत्र्य सैनिक शिकले – आधी १९०६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मग १९१६ मध्ये बाबासाहेब आंबेडकर. १९९७ साली ब्रिटनमधले भारताचे उच्च सचिव एल एम सिंघवी यांनी ग्रेज इनच्या आवारात आंबेडकरांच्या स्मरणासाठी एक झाड लावले होते.
https://www.youtube.com/watch?v=1WRECpcorfc (Clip from the biopic of Dr Ambedkar showing Gray’s inn)
 जवळचे ट्यूब स्टेशन: चांसरी लेन
संकेतस्थळ: www.graysinn.org.uk
--------------------------------------------------------------------------------------------
विशेष नोंदपेशवा क्रिकेट क्लब


2 Members of the club
पेशवा क्रिकेट क्लबचे सदस्य

पत्ता: जुइश फ्री स्कूल, द मॅाल, केंटन HA3 9TE
महत्व:


लेखक प्रसाद पितळेंबरोबर
लेखक प्रसाद पितळेंबरोबर

लंडनच्या वायव्य भागात दक्षिण आशियातील लोकांचं प्राबल्य आहे. वेम्बली-हॅरो सारख्या ठिकाणी तर ‘ज्योती ज्वेलर्स’ आणि ‘श्रीकृष्ण वडापाव’ अशा पाट्या विपुल आहेत. याच ठिकाणी ब्रिटनमधला एकमेव मराठी क्रिकेट क्लब आहे – पेशवा XI! २००२ मध्ये स्थापित झालेला हा मराठी क्लब इतर भाषकांसाठी पण खुला आहे. मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगशी संबंधित असलेल्या या संस्थेचे २ संघ आहेत. उन्हाळ्यात दर शनिवारी जुइश फ्री स्कूलच्या ‘होम ग्राउंड’ वर मॅचेस होतात. मी क्लबला माहितीकरिता इ-मेल केल्यावर त्यांचे अध्यक्ष डॉ. सचिन प्रभू यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारची मॅच बघायला मला ते स्वतःहून घेऊन गेले आणि सर्व सदस्यांची ओळख करून दिली. क्लबचे संस्थापक सदस्य श्री. प्रसाद पितळे यांच्या मते तरुण मराठी पिढीला आकर्षित कसं करायचं हा क्लबपुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
खास बात: पेशवा क्लबच्या सदस्यांच्या पत्नींनी स्वतःचा क्लब चालू केला आहे आणि त्याचे नाव आहे ‘मस्तानीज’!!! ;-)
 जवळचे ट्यूब स्टेशन: किंग्सबरी
संकेतस्थळ: www.peshwacc.co.uk
--------------------------------------------------------------------------------------------
मग काय म्हणता? पुढच्या लंडन भेटीत बघणार ना ही सगळी ठिकाणं? पण हो, तुमचा हा अनुभव मला कळवायला मात्र विसरू नका… वाट बघतोय!

No comments:

LinkWithin

Blog Widget by LinkWithin